पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Whose Counseling?
खुप जणांना हे पटणार नाही
काहींच्या भावना देखील दुखावतील पण एकदा नक्की वाचा …
मागच्याच महिन्यात माझे एक टेम्पोचालक परिचित त्यांच्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हणाले, “या आमच्या मुलाला दुकानात ठेवून घ्या.” पण मी त्यांना म्हटलं की “असं कसं घेणार ? त्याचे वय अठरा नाही त्यामुळे मी त्याला नोकरी देऊ शकत नाही.” त्यावर ते म्हणाले, “नोकरीला म्हणून ठेवून घेऊ नका. त्याला पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही. दहावीची परीक्षा झाली आहे तो मोकळाच आहे. शिक्षणातही त्याला फारशी गती नाही. जर तुमच्याकडे काम केले तर त्याला अनुभव येईल आणि तुमच्याकडे चांगले संस्कार घडतील.”
शिक्षणासाठी त्या मुलाला ठेवायचे म्हटल्यानंतर मी तयार झालो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून यायला लागला. त्याच्या प्रकृतीला, उंचीला झेपेल इतकेच काम त्याला द्यायला सुरुवात केली. तोही तसा बर्यापैकी प्रामाणिकपणे काम करत राहिला. त्याचे मित्रही अधूनमधून यायचे आणि त्याच्याशी काहीतरी बाहेर जाऊन बोलायचे. पण मी फारसे लक्ष दिले नाही. एक महिन्यांमध्ये त्याने सहा दांड्या सुद्धा मारल्या पण तेसुद्धा स्वीकारले. कारण तो शिकायला आलेला होता.
जरी त्याचे वडील म्हणाले होते की मुलाला तुम्ही काहीही देऊ नका तरी त्याच्याकडून फुकट काम करून घेणे मला प्रशस्त वाटले नसते. महिना झाल्यानंतर मी त्याला अडीच हजार रुपये पगार घ्यायचा ठरवला. आणि सांगितलं की आज पहिल्या महिन्यात मी तुला अडीच हजार रुपये पगार देतो तीन महिन्यांमध्ये तुझे काम बघून वाढवतो सहा दिवसाच्या सुट्या वजावट करून उर्वरित पगार त्याच्या हातावर ठेवला तेंव्हा तो नाराज झालेला दिसला पण माझ्या व्यवसायातली काहीही माहिती नसलेल्या आणि केवळ शिक्षणासाठी म्हणून दुकानात आलेल्या मुलाला अडीच हजार रुपये हे विद्यावेतन म्हणून योग्य आहे असे मला वाटले.
शिवाय उद्या त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेजची वेळ सांभाळून इथे काम करण्याची सवलतही त्याला दिली होती. आणि त्याच्या वडिलांनी माझ्यावर संस्कार करण्याचीही जबाबदारी टाकली होती त्यामुळे सध्या प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धा, त्याला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी हळूहळू समजावून सांगत होतो. शिवाय व्यवसाय चालवायचे मला जेवढे ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करत होतो, तेसुद्धा त्याला विद्यावेतन देऊन !
त्याने काहीतरी चांगले वाचावे म्हणून मी त्याला भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे ‘ माती, पंख आणि आकाश ‘ हे आत्मचरित्र वाचायला दिले. मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा स्वकर्तृत्वावर किती मोठा होऊ शकतो हे त्याला कळावे व त्याच्या मनात कष्टाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे हा माझा उद्देश ! पण पठयाने त्यातील एकही ओळ वाचली नाही आणि पुस्तक परतही केले नाही. शेवटी मीच आठवण करून दिल्यावर वडिलांनी आणून दिले.
नाराजीने त्याने पगार घेतला आणि त्यादिवशी दुकान संपल्यावर जो गेला तो आज पर्यंत परत आला नाही. त्याला पहिल्या पगारातच स्मार्टफोन घ्यायचा होता असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दहावीसुद्धा न झालेल्या मुलाला महिना दहा हजार रुपये पगार मीतरी देऊ शकत नव्हतो.
हीच गोष्ट माझ्या एका प्लम्बिंग कॉन्ट्रॅक्टर मित्राला सांगितली कारण मुलाचे वडील आम्हा दोघांचेही कॉमन मित्र ! मित्र म्हणाला, आपल्या मराठी मुलांना अनुभव न घेताच पगार हवा असतो त्यामुळे बाहेरची मुले येऊन नोक-या घेऊन जातात.
त्याने एक उदाहरणही दिले. सातारच्या हायवे जवळ एक नवीन चारमजली कपड्यांचा मोठ्ठा मॉल झाला आहे. तिथे त्याचे प्लम्बिंगचे काम चालू आहे. मालक सिंधी आहे. मॉलमध्ये दीडशे मुले काम करतात. सगळी मुले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथील आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास ड्युटी असते. सर्व मुलांची राहण्याची, जेवणाची सर्व सोय मालकाने केली आहे. सगळी मुलं इतक्या तन्मयतेने काम करतात की आलेला ग्राहक खरेदी न करता परत जातच नाही. आता हीच मुले सर्व शिकून घेतील आणि भविष्यात आपल्या महाराष्ट्रात स्वतःची दुकाने उघडतील.
आपल्या नाकर्तेपणामुळे एकाच ठिकाणच्या दीडशे नोक-या आणि संधी गेल्या की हो ! याचा खेद, खंत आहे कोणाला ? आणि आमची मराठी मुले (Marathi children) शिवाजीमहाराजांसारखी दाढी वाढवून, चंद्रकोरीचे गंध लावून, वडिलांनी घेतलेल्या बुलेटला भगवा झेंडा लावून फिरतात ! शिवाय तथाकथित मराठीप्रेमी नेते या मुलांना तोडफोड करायला लावून त्यांचे आयुष्य बरबाद करतात.
अरे, या अमराठी लोकांना हाकलून दिले तर त्यांचे काम किती मराठी तरुणांना येते ? सुतारकाम, गवंडीकाम, टाईलफिटर असे कितीतरी व्यवसाय मराठी व्यावसायिकांच्या हातातून निघून गेलेत. मी माझ्या दुकानासाठी कामगार पाहिजे अशी जाहिरात देतो तेंव्हा आलेल्या उमेदवारांची मी मुलाखत घेण्यापूर्वी ती मुले माझीच मुलाखत घेतात. त्यांचे तीन प्रश्न ठरलेले असतात, पगार किती देणार ? सुट्टी केंव्हा असते ? आणि कामाचे तास किती ?
पण कोणीही विचारात नाही की काम काय आहे ? त्यामुळे आता या मराठी मुलांचा भविष्यकाळ काय असेल या विचाराने माझा थरकाप होतो.
या सर्वाला आपण पालक जबाबदार आहोत असे वाटते. आपण आपल्या मुलांच्याभोवती अती सुरक्षिततेचे कवच निर्माण केले आहे. त्यांना जगाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर फेकून द्यायला हवे.
एकापत्य संस्कृतीत (Monolithic Culture) नको तेवढे मुलांना जपत आहोत आपण. मागितले की सारे क्षणार्धात त्यांच्यासमोर हजर करत आहोत आपण त्यामुळे कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवावी लागते हेच मुलांना माहीत नाही. दोष मुलांचा नाही, आपला आहे. आपण कष्टात दिवस काढले, मुलांना कशाला त्रास हा विचार त्यांची भवितव्य बिघडवतो आहे हे आपल्याला कधी कळणार ? आज जेंव्हा रोज पिझा, बर्गर खाऊन थूलथूलीत झालेली अन कानात बुचे घालून मोबाईलसमोर वाकलेली मुले पाहतो तेंव्हा त्यांच्या पालकांनाच समुपदेशनाची ( Counseling ) गरज आहे असे वाटते.
समुपदेशन कुणाचे? | Whose Counseling? -@अभय शरद देवरे
समुपदेशन कुणाचे? | Whose Counseling? हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
समुपदेशन कुणाचे? | Whose Counseling? – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.