Behavior after retirement is endless

निवृत्तीनंतरचे वागणे अंतहीन | Behavior After Retirement is Endless

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Behavior After Retirement is Endless

ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58/60 व्या वर्षी तो रिटायर्ड (Retirement) झाला आणि त्याचं जगच बदललं.

नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्याबरोबर त्याचे डोळे मिटायला लागत.

ऑफिसात सगळा स्टाफ त्यावर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या (Retirement) सभारंभाला खूप हळहळले पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे.

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो तेवढं घरी रहाणं जमत नाही ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड (Retirement) झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेव्हा हौस करायची वेळ होती तेव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

गरजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड (Retirement) होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड (Retirement) होता येणार नाही ही जाणीव तिला बोचत असावी.

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेताना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला काडीचा हातभार न लावणारा स्थितप्रज्ञ नवरा.

तो समोर नसला की त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये करतोस’ म्हणत ती त्याला झिडकारायची.

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांची मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, ‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्.’

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं…., ‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’ तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली, ‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणला, ‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो.’

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणा साठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. तिच्या मनांत तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती.

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचार शक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरांत धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावा प्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘वेळवारी असं मरण हवं’ हा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता तर ही वेळ आली’ म्हणले. आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चाललंय?’ वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या जगांत निघून गेले.

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं करायचं?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण ‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’ हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसली रहायची.

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. ‘तुझी उपयोगिता संपायला आलीय’ याची जाणीव लोक आडून पाडून करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासूसाठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं.

ती रोज आतल्या आत रडायची. ‘देवा, उचल मला’ म्हणून प्रार्थना करायची. ‘भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला’ म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडली रहायची.

फारसं आठवायचं नाही तिला काही आजकाल, मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते….

‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता, आणि ‘तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं….

मित्रांनो आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त (Retirement) झाले आहेत व काही निवृत्ती (Retirement) ‘च्या उबंरठ्यावर आहेत . एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा🙏

🙏एक अनामिक 🙏

निवृत्तीनंतरचे वागणे अंतहीन | Behavior After Retirement is Endless हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

निवृत्तीनंतरचे वागणे अंतहीन | Behavior After Retirement is Endless – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share निवृत्तीनंतरचे वागणे अंतहीन | Behavior After Retirement is Endless

You may also like

One thought on “निवृत्तीनंतरचे वागणे अंतहीन | Behavior After Retirement is Endless

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock