Dear Zindagi

डिअर जिंदगी | Dear Zindagi

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Dear Zindagi

त्याला वाचता येतं ?
काय राव ?
काहीही विचारता ?
चांगला शिकलेला आहे.
एम काॅम, आय.सी. डब्यू. ए. झालाय.
सी.ए. सुद्धा करणार होता..
मधेच हे शेअरचं खूळ शिरलं डोक्यात..
दिवसभर नुसतं ‘शेअरींग इट’.
शेअरमधला किडा आहे तो.
मान सदैव वाकडी.

एक कान फोनला चिकटलेला.
फेविकाॅलच्या मजबूत जोडसारखा…
डोक्यात फक्त सेन्सेक्स.
कधी फुलटाॅसवर सिक्सर नाहीतर याॅर्करवर दांडीगुल.
लंबे रेस का खिलाडी है वो.
प्रत्येक कंपनीचा लेखाजोखा आहे त्याच्याकडे.
मान मोडून होमवर्क करतो तो.
मार्केटविषयी त्याचे स्वतःचे खास आडाखे आहेत.
सेफली खेळतो.

सहसा त्याचे अंदाज चुकायचे नाहीत.
बंगला,गाडी,आँफीस,स्टाफ.
लहान वयात बरीच मजल मारलीय त्यानं.
ऊपयोग काय ?
एवढा पैसा मिळवून भिकारी.
एका पैशाचा उपभोग घेतला नाही कधी.
कुठं फिरायला जाणं नाही की,
बायकापोरांशी दोन शब्द निवांत बोलणं नाही.
त्याच्या डोक्याच्या सेलमधे आँलवेज एकच अँप.
24×7 तेच अँक्टिव्हेट असायचं.

शेअर ईट.
बरं ते जाऊ दे.
तुम्ही काय विचारत होता ?
ओहो..
आत्ता अर्थ कळला त्याचा.
खरंय.

त्याला वाचता येत नाही.
शाळेची, काॅलेजची, अभ्यासाची पुस्तकं
नाईलाजानं वाचावी लागली तेवढीच.
पुढे पेपरही वाचायचा तोही फक्त फायनान्सच्या पेजपुरता.
आता तर मोबाईल नाही तर चॅनलवर सगळं लाईव्ह येतं.
पेपरही वाचणं सोडून दिलंय त्यानं.
कथा, कादंबरी, कविता….

पुस्तक वाचणं हा तद्दन गाढवपणा आहे’ असं म्हणतो तो.
वाचण्यात वेळ घालवणं म्हणजे लाखोंचं नुकसान.
जाऊ दे.

आपल्याला काय करायचंय ?
आठ दिवसांपूर्वी आलाय तो इथं.
अंगात ताप, जरासा खोकला.
आला तेव्हा नुसता तडफडत होता.
मार्केटपासून कोसो दूर.
जलबीन मछली.

इथं रिकामं बसून राहणं म्हणजे,
लाखोंचं नुकसान.
नुसती चळवळ, वळवळ आणि तळमळ.
तसं फारसं काळजीचं कारण नव्हतं.
इन्फेक्शन फारसं नव्हतं.
वीकनेस मात्र भरपूर होता.

बापानं चांगला सटकावला त्याला.
त्याचा सेलफोन काढून घेतला.
नाहीतर पुन्हा त्याचं मार्केट सुरू व्हायचं.
साधा टिकलीवाला फोन टेकवला त्याच्या हातात.
माझ्या शेजारच्याच काॅटवर.

दोन चार दिवसात बऱ्यापैकी सुधारला.
रिकामपणी करायचं काय ?
तसा घुम्याच होता.

रिकामपण खायला उठलेलं.
माझाही स्वभाव तसा फारसा बोलका नाहीच.
इथं कोविडवाॅर्डमधे येताना ,
दहा पंधरा पुस्तकं घेवून आलेलो.
दिवसभर वाचत बसायचो.
एक दिवस त्यानं मला विचारलं.
‘मी वाचू का एखादं किताब यातलं ?’

“वाच की…
मराठीतलं पुस्तक आहे बाबा हे.
तुला वाचता येतं काय ?”
मी हसत हसत विचारलं
“गुज्जू असलो म्हणून काय झालं ?
बचपन गिरगावातल्या चाळीमंदी गेलाय माजा.
मराठी शाळेत शिकलोय मी बी”

तो सांगत होता.
“हे वाच.
हे आवडेल तुला….”
मी त्याच्या हातात एक पुस्तक दिलं.
तो मॅडसारखा वाचतच बसला.
बसून, लोळून, पालथा पडून.
फक्त वाचतच बसला.
फारशी सवय नव्हती.
वाचायचा स्पीड कमी होता.
पण गुंतून गेला.

अनुवादीत कादंबरी होती.
एक तरूण करोडपती.
शून्यातून जग उभं केलेला.
तहानभूक विसरणारा वर्कोहोलीक.
अचानक एक दिवस कॅन्सर डिटेक्ट होतो.
पंधरा दिवस ट्रीटमेंटसाठी अँडमीट होतो.
आयुष्यात स्वतःसाठी कधी वेळच दिला नसतो.
स्वतःशीच बोलू लागतो.

स्वतःच्या स्वभावाचं पोस्टमार्टम.
बायकापोरांशी, आईवडिलांशी तुसड्यासारखं वागणं.
सतत पैशामागं धावणं…
पापपुण्याचा हिशोब.
स्वतःची चूक समजते…
तोपर्यंत ऊशीर झालेला असतो.
डाॅक्टर सांगतो , फक्त एक वर्ष हातात आहे.
तो घरी जातो आणि बदलून जातो..

पैशाची खरी किंमत कळते.
एक वर्ष आयुष्य भरभरून जगतो.
अगदी समाधानात.
वर्ष संपत आलेलं.

तो तरूण हसत हसत मरणाला सामोरं जायला तयार.
मरण येतच नाही.
हसत हसत त्याच्या डाॅक्टरमित्र सामोरा येतो.
एवढंच म्हणतो,

“जगण्याची किंमत मरणाच्या भितीशिवाय कळत नाही..
नाटक केलं मी..
तुला काहीही झालेलं नाहीये..”
तो मित्राला गच्च मिठी मारतो.
डबडबत्या डोळ्यांनी थँक्स म्हणतो.
‘डिअर जिंदगी’.

माझं आवडतं पुस्तक होतं ते..
खरं सांगू ?
पुस्तकं बोलतात.
अक्षर जिवंत असतात.
त्यांना बोटांचा स्पर्श समजतो.
शब्द खुदकन् हसतात.

नाहीतर टिपूस रडतात सुद्धा.
पुस्तकं जगणं शिकवतात.
सांभाळून घेतात.
शाब्बास म्हणतात नाहीतर कधीकधी कानही पिरगाळतात.
पुस्तक सच्चा दोस्त असतो आपला..
मी नाही, तो म्हणतोय असं.

पार बदललाय आता तो.
‘डिअर जिंदगी’नं पार मेकओव्हर झालाय त्याचा.
चीडचीड, ऊतावळेपणा कमी झालाय.
शब्दांची किंमत समजलीय.
शब्दांनी घायाळ करणं सोडून दिलंय त्यानं.
समोरच्याची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करतो तो.
त्याच्या शब्दात सांगू ?

तो म्हणतो , पुनर्जन्म झालाय माझा…
रोज रात्री घरनं फोन येतो.
तक्रार करणं सोडून दिलंय त्यानं.
सगळ्यांशी पोटभर बोलतो.
प्रेमानं,आपुलकीनं चौकशी करतो..
भारीये हे.

आजच, पुस्तक दिनाच्या मुहूर्तावर,
डिस्चार्ज मिळालाय आम्हा दोघांना.
जाताना पोटभर रडून गेला.
“जीना सिखा दिया ये किताबने…”
असं म्हणाला.

दोन पुस्तकं घेऊन गेलाय जाताना..
25 k चा चेक दिलाय मला.
“300 बेड आहेत ईथे.

सगळ्यांची पाॅझीटीव्हिटी वाढेल अशी पुस्तकं मागव.
आणि इथं सगळ्यांना वाचायला दे”
रूला दिया पगले ने..

पुस्तक दिवसाचं याहून दुसरं चांगलं सेलीब्रेशन ,
ते काय असणार ?
सगळ्यांना हॅप्पीवाला पुस्तक डे !

©कौस्तुभ केळकर नगरवाला

डिअर जिंदगी | Dear Zindagi

डिअर जिंदगी | Dear Zindagi – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share डिअर जिंदगी | Dear Zindagi

You may also like

2 thoughts on “डिअर जिंदगी | Dear Zindagi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock