Even though he is not visible, his existence is felt ..!

तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..! | Even Though He is Not Visible, His Existence is Felt ..!

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Even Though He is Not Visible, His Existence is Felt ..!

आज आई खूप रडत होती… बाबांनी घरातले सगळे देव (God) पिशवीत भरले होते आणि नदीत विसर्जन करायला निघाले होते.. आईचा देवावरचा प्रचंड विश्वास बाबांना खपायचाच नाही.माणसाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास हवा हे त्यांचं ठाम मत.. कमकुवत माणसं देवाच्या नादी लागतात आणि स्वतः कष्ट करत नाहीत आणि आईचं तेच होत चाललं आहे ही त्यांची तक्रार होती. आता हे देव नकोच..

घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य ‘देवाची कृपा’..!आता बाबांनी विडाच उचलला बघू हिचे देव स्वतःचं तरी रक्षण करू शकतात का?नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का?

रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले.. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने…

इकडे रडून रडून आईचे डोळे अक्षरशः सुजले होते..

आज आईचं अजिबात ऐकत नव्हते बाबा आणि म्हणाले, “याद राख एकजरी देव विकत आणलास तर.. ”

आईला तर सुचतच नव्हते काय करावं ?तिला वाटतं होतं निदान घरात राहू द्यावे देव,हवं तर पुजा करणार नाही मी.. पण असे देव्हारा रिकामा करू नये शेवटी तिची शक्ती होती ती.

एरवी बाबा एकदम प्रेमळ माणूस.. पण देवावर अजिबात विश्वास नाही आणि त्यामुळे आईचं आणि त्यांचं नेहमीच खटकायचं त्यावरून…

इतके दिवस निदान पूजा तरी करू द्यायचे पण कालपासून आई गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करत होती आज अर्ध्या दिवसांनी बाजारातून सजावटीच्या ,पूजेच्या तयारीसाठी सगळं घेऊन घरी आली.किती हा टाईमपास आहे असं वाटून तेवढ्या वेळात बाबांच्या रागाचा पारा चढलेला होता…

आईला फारच मोठा धक्का बसला….

आईला माहित होते काही दिवसांनी राग उतरल्यावर बाबांना त्यांची चूक समजेलही पण गणेशउत्सव संपल्यावर उपरती होऊन काय उपयोग?

खूप चलबिचल वाढली होती मनाची तिच्या..

देव असतो की नसतो ?ह्या विषयावर तिला बोलायचंच नव्हतं.. देवाची पूजा केल्यावर मनाला प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो हा साधा सरळ हिशोब होता तिचा.परत बाबांनी देवाचं काहीही करावं अशी अपेक्षा कधीच केली नाही तिने. तिला साधी मनोभावे पूजा करायची असायची,काही चांगलं झालं की देवाच्या कृपेने होते आहे ही भाबडी असेल, पण श्रद्धा होती तिची..

बाबांना हे पातक करण्यापासून कसे थांबवायचे सुचतच नव्हते तिला… देवाचा सन्मान बाबांनी कधीच केला नव्हता,आईची हरकत नव्हतीच त्याला. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असे मानून ती पुढे चालायची..

देवावर विश्वास ठेवावा की नाही हे ज्याने त्याने आपापल्या अनुभवावरून ठरवावे पण दुसऱ्यांनी काय विचार करावा ?मग ती हक्काची बायको का असेना ठरवायचं अधिकार कोणालाच नसावा.

बाबांची गाडी आलिशान बंगल्यातून बाहेर पडत होतीच तेवढ्यात आस्थाची शाळेची बस आली.पाचवीतली आस्था रडत रडत बसमधून खाली उतरली.बाबांना गेटवर पाहून तर अजून हुंदके देऊन देऊन रडायला लागली..

आस्था म्हणजे जीव की प्राण होती बाबांचा.. !

तिला रडताना पाहून गाडी गेटमधेच ठेऊन बाबा धावत गेले तिच्यापाशी..

तिला कडेवर घेतलं आणि विचारलं , “काय झालं का रडते आहेस बाळा?काही लागलं का ?कोणी बोललं का ?सांग .. बाबा आहेना बघून घेईन कोणी माझ्या छकुलीला त्रास दिला?”

रडता रडताच तिने तिच्या दोन्ही मुठी उघडल्या तर हातात मातीचा गोळा होता.ती बोलायला लागली, “बाबा तो मयंक फार फार वाईट आहे,आमच्या शाळेत आज मातीचा गणपतीबाप्पा बनवायचं वर्कशॉप होते.. मी इतका सुंदर गणपती बनवला! मॅमनी पूर्ण क्लासला दाखवला आणि मला शाबासकी दिली.. शाळा सुटल्यावर मयंकनी माझा बाप्पा हिसकावला आणि शाळेतल्या माठात टाकून दिला सगळा बाप्पा विरघळला …एवढीच माती मी हात घालून मिळवली.

बाबा इतका वाईट आहे मयंक,मी कधीच बोलणार नाही आता त्याच्याशी.असं कधी बाप्पाला पाण्यात फेकतात का?पण मला ड्राइवर काका म्हणले तू ह्या मातीपासून परत बनव देवबाप्पा,बाप्पाला कोणीच मोडू शकत नाही.

बाबा मला बाप्पा बनवायला कोण मदत करेल आता? ही माती पण उरली नाही.. ”

बाबांना एकदम भरून आले होते..अश्रूंनी डोळे भरले होते,लाडक्या लेकीच्या डोळ्यातली हतबलता पाहून..

“मला बाप्पा बनवायचा आहे बाबा,त्या मयंकला रागवा तुम्ही खूप !”असे म्हणून आस्था परत जोरजोरात रडायला लागली..

खिशातल्या रूमालानी बाबांनी तिचे डोळे पुसले..

आणि म्हणाले चल आपण बनवू बाप्पा..

पण त्या आधी मला एक काम करायचे आहे,

असे म्हणून बाबांनी गाडी परत जागेवर लावली आणि सांभाळून पिशवी बाहेर काढली.आस्था म्हणाली, “ हे काय आहे बाबा आपले देव का ठेवलेत पिशवीत ?”

तसे बाबा आईकडे बघून म्हणाले,”आईने ठरवलंय की ह्या वर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा तू,तुझी आई आणि तुझे बाबा बनवून देव्हाऱ्यात ठेवणार.. हा गणपती कधीच पाण्यात जाणार नाही आपण विसर्जन सुपारीच्या गणपतीचं करायचं…

आज आपल्याला सगळे देव स्वच्छ करायचे आहेत.

बाकी सगळी तयारी आईने केलीये म्हणून ह्यावर्षी देव मी स्वतः चमकावणार आणि स्थापित करणार..

आस्थाने बनवलेल्या गणपती बाप्पाला आता अढळस्थान मिळणार ह्या देव्हाऱ्यात.

आस्था जा पटकन हातपाय धुवून ये आपण नविन माती आणायला जाऊ आपल्या बागेतून.”

आई शांतपणे बाजूला उभं राहून बाबांचा बदललेला अवतार बघत होती.

आस्था गेल्यावर हळूच म्हणाली, “काहो दुसऱ्याच्या लेकीच्या डोळ्यात पाणी पाहून हृदय द्रवल नाही तुमचं,स्वतःच्या लेकीच्या डोळ्यात अश्रू काही क्षण पण सहन झाले नाहीना ?”

बाबा हसून म्हणाले, “हो खरंय तुझं नाही बघवलं मला आस्थाला कासावीस होताना, पण माझे डोळे उघडले ह्या विघ्नहर्त्याने…

मी फार तोऱ्यात तुला म्हणालो होतो की बघू ‘तुझे देव स्वतःचं रक्षण करतात का ?’निघालो होतो सगळ्यांना नदीत विसर्जन करायला आणि बघ ना बंगल्याच्या गेट च्या बाहेर सुद्धा त्यांनी मला जाऊ दिलं नाही.

आस्थाच्या रूपात त्यांनी माझे डोळे उघडले एवढंच !

देव नावाचं काही मूर्तरूप आहेका हे मी नाही सांगू शकणार.. पण एक अज्ञात शक्ती आहे जी कुठेतरी कधीतरी तुम्हाला स्वतःची जाणीव करून देते एवढं मात्र नक्की.”

आई समाधानाने बोलली, “मला तर ती शक्ती नेहमीच जाणवते.. आपल्यावरची कित्येक विघ्न देवाने दूर केली.पण आज विघ्नहर्त्याने स्वतःवरचं विघ्न दूर केलंय.

तेवढ्यात आस्था आली आणि ते तिघेही गणपती बाप्पा बनवण्यासाठी बागेतून माती घेऊन आले..

जो विधाता साऱ्या सृष्टीचं रक्षण करतो तो स्वतःचं रक्षण करणारच ना

तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..! | Even Though He is Not Visible, His Existence is Felt ..! ही कथा अवडला असल्यास शेअर करा.

तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..! | Even Though He is Not Visible, His Existence is Felt ..! – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..! | Even Though He is Not Visible, His Existence is Felt ..!

You may also like

2 thoughts on “तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..! | Even Though He is Not Visible, His Existence is Felt ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO