पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Half truth
फेसबुक हे आभासी जग तर आहेच
पण इथे कोणाची कधी आणि का मैत्री होईल हे सांगता येत नाही
आणि कधी आणि का तुटेल हे देखील सांगता येत नाही
तिची आणि त्याची अशीच मैत्री झालेली
दोघेही दिसायला आकर्षक
आणि दोघेही लिखाणात हुकमी एक्के
त्याचे विषय वेगवेगळे तर ती बहुतेक वेळा एकाच पठडीतलं लिहायची
दोघेही कुठेतरी अपूर्ण होते
ती अपूर्णता सजवून लिहायची… अगदी बेमालूमपणे
तर त्याच्या लेखी अपूर्णता हा मनाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवलेला विषय होता
तिच्या विरहाची अपूर्णता अशा शब्दांत असायची की प्रत्येकीला ते आपलंच मन लिहिलंय असं वाटावं
तर त्याच्या लिखाणात मिलनाची अपूर्णता असायची
तिचं लिखाण अस्तित्वदर्षी तर ह्याचं म्हणजे एक फॅन्टसी
तसंच पाहायला गेलं तर जमीन अस्मानाचा फरक… आणि तसंच पाहायला गेलं तर कुठेतरी विरह विणेचे सूर एकमेकांना अगदी पूरक
…
“आय ॲम बिग फॅन ऑफ युवर राइटिंग अॅण्ड ह्युज फॅन ऑफ युवर लूक्स” त्याने एकदा आपल्या मनातल्या तिच्याप्रती वाटणार्या भावना सरळ इनबॉक्स मधे लिहून टाकल्या.
नंतर लक्षात आल्यावर तो तिला सॉरी म्हणाला
“तुला माहित आहे? आज मला खूप आनंद झालाय. आय फील ऑनर्ड. आपल्या लिखाणाची, दिसण्याची कुणी तारीफ करणं, किंवा आपल्याबद्दल एखाद्याला लिहावसं वाटणं ही फार छान गोष्ट आहे” ती पटकन त्याला एकेरीत बोलून गेली
पण तिच्या एकेरी बोलण्याने दोघांमध्ये एकदम कंफर्ट आल्याचा फील आला.
…
आसंच एकदा तिने लिहिलं होतं…
सर्व काही तुझे घेऊन जाशील तू
राहील तो माझ्या श्वासात तुझा श्वास
त्या क्षणांचा तो बेधुंद सहवास
राहील तुझी प्रेमपत्रे अणि शपथा
माझ्या डोळ्यात तुझी हसरी प्रतिमा
राहील ती माझ्या मनात तुझी आठवण
तिथल्या कणाकणातील प्रेमळ साठवण
राहील ते बंधन, माझे वचन कसे नेशील तू
बाकी सर्व काही तुझे घेऊन जाशील तू
ती
“एक विचारू?” तो म्हणाला “तू कायम प्रेम विरह कथा लिहितेस? काही कारण?” त्याने मेसेज केला
ती एक मिनिट शांत राहिली आणि म्हणाली
“दोन वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक जण अचानक आला. आणि एक दिवस तसाच अचानक गायब झाला. त्याने मला जाणून घेतलं होतं समजून घेतलं होतं! मी पण हळूहळू त्याच्याकडे आकर्षित झाले. मी त्या अदृश्य व्यक्तीवर प्रेम करायला लागले आणि तो हवेत विरून गेला. माझ्यापाशी त्याचा ना पत्ता ना फोन नंबर. त्याने त्याचं एफबी अकाउंट बंद केले त्यामुळे मेसेंजर वरून पण काहीच संपर्क साधला जात नाही. पण जाताना तो मला एका विरहात आणि न संपणाऱ्या विचार चक्रात अडकवून गेला”
“तुझं लग्न झालंय?” तिच्या मेसेजने त्याची विचार शृंखला तोडली
“नाही… हो… पण आता सिंगल आहे”
“म्हणजे?”
“एक्सीडेंट”
“ओह.. सॉरी”
“इट्स ओके… तुझं?”
“हो! पण त्याबद्दल न बोललेलं बरं”
तो शांत राहिला… तीच बोलायला लागली
“सात फेरे घेतले आणि मंगळसूत्र घातलं म्हणून कुणी स्त्री सौभाग्यवती होत नसते. काही फासे चुकीचे पडले तर त्या फेर्यांच्या अग्निची ऊब मिळत नाही तर दाह जास्त जाणवतो आणि मंगळसूत्र हे लोढणं होतं”
बोलताना तिच्या डोळ्यात पाणी तरळ्याचा त्याला भास त्याला तिच्या मेसेज मधून झाला.
त्याला जाणवत होतं की तो तिच्यात गुंतत चालला आहे.
ज्या व्यक्तीला तो एफबी वर फॉलो करायचा ती आज त्याच्याशी इनबॉक्स मधे मनमोकळेपणाने बोलत होती ही भावनाच त्याला मानसिक सुख देवून जात होती.
खरं म्हणजे तो तिच्या लूक वर फिदा होता पण तिचं लेखन सुद्धा तेव्हढेच आकर्षक
तिचा ग्रेस, तिची मेसेज वर बोलायची पद्धत त्याला तिच्यात आणखीन गुंतवत होते
पण त्याला तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता
…
दोन दिवसाने त्याने मेसेज केला…
मी ज्यावेळी तुला पहिल्यांदा पाहिलं ना!
हो पहिलंच! तुला मी आधी वाचलं नाही तर पाहिलं होतं
तेंव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो
रूढार्थाने किंवा व्यावहारिक अर्थाने प्रेम नाही हे!
हे बंधन वेगळंच होतं आणि आहे
शारीरिक आकर्षण म्हणावं तर ते बिलकुल नाही
हे प्रेम जे आहे ते सगळ्यांच्या परे आहे
ना त्यात काही हक्क मिळवण्यासाठी धडपड ना शरीराचा हव्यास
कारण? कारण मला माहीत नाही
तरी सुद्धा तू मला माझी वाटलीस
ज्या ज्या वेळी मी तुला पाहतो त्या त्या वेळी माझे मन एका अनामिक असाह्यतेने आणि अगतिकतेने भरून येते.
मला खरंच कळत नाही की…
तुला पाहिल्यावर माझ्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव होते
आणि ती कमतरता तूच पूर्ण करू शकते
पण… पण…
मला माहित आहेत तुझी बंधनं
मला मान्य आहेत माझ्या मर्यादा
आपण नदीचे दोन काठ
शेवटापर्यंत कायम समांतर राहायचं
तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की त्यात एक खोल समुद्र दिसतो
आपल्या अथांग खोलीत अनेक अकथनीय गोष्टी दडवून बसलेला
अनेक वेदना आपल्या गर्भात ज्यांने दाबून ठेवल्या आहेत
कधीकधी वाटते तुला बोलते करावे
तुझ्या डोळ्यांना हास्य द्यावे
तुझ्या ओठातील शब्दांना रूप द्यावे
पण त्यावेळी मला माझ्या मर्यादांची जाणीव होते
मग मी परत दोन पावलं मागं सरकतो
परत त्या असाह्यतेने पहात राहतो!
तू दिसते त्यापेक्षा लिहितेस त्याहून सुंदर
तुझ्या प्रत्येक शब्दातून प्रेम ओथंबून भरून वहाते
पण कुठेतरी ते शब्द विरहिणीचे वाटतात
त्यात कुठेतरी आंतरिक आर्तता जाणवते
काहीतरी तुटलेलं!
ते म्हणतात ना देअर इज नो बेटर दॅन बेस्ट
खरंय! पण तुझ्या बाबतीत नाही…
कारण यू आर बेस्ट दॅन बेस्ट!!
…
“माझ्या बद्दल आहे ना?” तिने विचारले
तो गप्प राहिला
मनात असून सुद्धा बोलला नाही
थोडा वेळाने त्याने मेसेज केला “नाही! असं काही नाही… जनरल लिहिलंय”
“अरे स्त्रियांना सिक्स्थ सेन्स असतो. आम्हाला पटकन कळतं”
“हो… तुझ्याबद्दलच आहे” त्याने कबूल केले
“प्रेमात आहेस का माझ्या?” तिने काहीसे डायरेक्ट विचारले
“… हो…पण प्लॅटॉनिक… तुझ्या मनाच्या प्रेमात… तुझ्या प्रतिभेच्या प्रेमात… तुझ्या लिखाणाच्या आणि साधेपणाच्या… मी आधीच सांगितलंय… ह्युज फॅन
मला माहित आहे तुझी मजबूरी आणि माझी मर्यादा… तरी पण…”
ती शांत राहिली
शेवटी त्याने मेसेज केला…
“डोन्ट वरी! हे मी तुला आज पहिल्यांदा आणि शेवटच सांगितलं… ह्यापुढे मी असं कधीच बोलणार नाही… मनातल्या भावना मी बदलू शकत नाही पण त्या कधी व्यक्त होणार नाहीत… मला तुला कुठल्याही धर्म संकटात टाकणार नाही… तुझं काहीही उत्तर असू दे… ते तुझ्याकडेच ठेव”
कुठेतरी त्याला वाटत होतं की तिला हो म्हणता येणार नाही आणि त्याला नाही ऐकवलं जाणार नाही
…
त्या रात्री त्याने आपल्या डायरी मधे लिहिलं…
तिचं लिहिलेलं मी ज्यावेळी वाचायचो तेंव्हा त्या लिखाणात मला एक आर्तता जाणवायची. कुठेतरी काहीतरी तुटलंय असं वाटायचं. शांत ओघवत्या प्रवाहाला खिन्नतेचा किनारा लाभला होता बहुतेक!
एके दिवशी तिचं लिखाण मला एका फेसबुक ग्रुप वर सापडलं.
हो! सापडलं असंच म्हणावं लागेल.
कधीकधी असं होतं ना की तुम्ही काहीच शोधत नसता… आयुष्याच्या रस्त्यावरून खाचखळगे टाळत, काटे बाजूला सरकवत पुढे पुढे जात असता… आणि अचानक त्या कंटकांमध्ये तुम्हाला एखादा प्रेशस जेम मिळवा तशी ती माझ्या नजरेस पडली.
तिला वाचल्या क्षणी मला आतून कुठेतरी वाटलं की ही माझीच आहे.
म्हणजे काही हक्क नाही तरी कुठेतरी मानसिक कनेक्शन जाणवलं.
त्या क्षणी मी ठरवलं की तिला हृदयाशी घट्ट कवटाळून ठेवायचं.
ती म्हणजे माझाच एक अविभाज्य भाग आहे.
का असं वाटतं कायम तिला पाहिल्या पासून, हे मला न सुटलेलं एक कोडं आहे.
मी तिचा आणि ती माझी कोणीच नाही. पण मग हा मनातला आपलेपणा का वाटावा तिच्या बद्दल?
काही दिवसांनी मी तिला पाहिलं… प्रत्यक्ष नाही तर फक्त प्रोफाइल पिक्चर मधे.
आणि अचानक काहीतरी झालं.
त्या चेहर्यावर आणि विशेषतः त्या डोळ्यांवर प्रेम दाटून आलं.
वाटलं की सर्व बंधनं आणि मर्यादा विसरून तिला आपलीशी करावं.
नितांत सुंदर आहेत तिचे डोळे आणि सगळेच एक्स्प्रेशन्स.
म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साइट होतं ना तसं मला काहीसं झालं जेंव्हा मी तिला पाहिलं!
पण तिला असं काही वाटेल माझ्याबद्दल?
शक्यता फार धूसर आहे!
ती मला जरी आपलीशी वाटली तरी तिला मी वाटला पाहिजे ना?
मी जरी तिच्या प्रेमात असलो तरी तीच्या मनात तेव्हढीच अनामिक ओढ असली पाहिजे ना?
जर असेल त्या अनामिक ओढिला प्रेमाच्या कोंदणात बसवता येईल.
मला कळत नाही की तिच्या मनात सतारीच्या काही तारा छेडल्या जात आहेत का नाही?
पण मग विचार करतो की मी तिच्या मनावर प्रेम केलंय! हे जरूरी नाही की तिनेही माझ्या वर प्रेम करावं!
ही भावना मनाच्या एका कोपर्यात मी तशीच जपून ठेवू शकतो.
कारण माझ्या लेखी माझी ओढ पवित्र आहे. माझ्या प्रेमाला तिचे रूप, तिचे डोळे आणि कदाचित विचार सुद्धा मांगल्य प्रदान करत आहेत.
शेवटपर्यंत ह्या प्रेमाखातर झुरण्यापेक्षा का नाही मी ह्या प्रेमाला माझ्या जीवनाचा आधार बनवू?
पिसारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे राणी |
तुझ्या मनगटी ही बसले कुणी भाग्यवंत ||
कदाचित मला तसे भाग्य नसेल पण माझ्या प्रेमाचे मांगल्य टिकवणे माझ्याच हातात आहे ना!!!
कोणा कशी कळावी वेडात काय गोडी…
तो
…
काही नाती व्यावहारिक असतात तर काही भावनिक असतात.
अशा नात्यांमध्ये व्यावहार शून्य असतो. गुंतल्या असतात त्या फक्त भावना.
त्या कुठल्या भावना असतात? हे सांगणं कठीण आहे.
आपुलकी, प्रेम, काळजी, चुटपुट, व्याकुळता सगळं असतं त्यामधे.
एक प्रकारची कशीश असते अशा नात्यांमधे
मी तिच्याशी बोलावं, कधी बोलणार हा, काय बोलणार हा? ही चुटपुट तर त्याच्या शिवाय अणि त्याच्या आठवणीत भरून येणारं मन, ही हृदयातली व्याकुळता फक्त अशा भावनिक प्रेमात असते.
असंच काहीसं भावनिक नातं आहे, त्याचं अणि तिचं!
गंमत आहे ना! फक्त तिच्या प्रोफाईल पिक्चर कडे पाहून तो असे कल्पनांचे इमले रचत असतो.
भूमितीत, वर्तुळाला जसा टॅन्जन्ट असतो, बाहेरून परिघाला फक्त स्पर्श करून जाणारा… वर्तुळ केंद्राला कोण कुठे कुठल्या बिंदूत स्पर्श करून गेलं ते कळतही नसावं.
तसाच तो तिच्यासाठी होता. बाहेरून तिच्या ऑराला स्पर्श करून जाणारा.
तिच्या कोअर पॉईंटला हे अस्तित्व जाणवत देखील नसेल!!
…
अचानक काहीतरी झालं
त्याला कळले नाही की परस्थितिने एकशे ऐंशी अंशांचा कसा टर्न घेतला ते…
एक दिवस तिचा मेसेज येणं अचानक बंद झालं
त्याने एक दोन वेळा प्रयत्न केला पण तिच्याकडून आपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही
तो शांत राहिला… पण संभ्रमात
आधी मधून मधून आणि नंतर रोजच ती त्याला फेसबुक वर दिसायला लागली
तिच्या नवीन आणि तेव्हढेच आर्त लेखांमध्ये ती त्याला दिसायला लागली
पण… ती
त्याच्या लेखांना प्रतिसाद आणि दखल असते तिची बर्याच वेळा …
पण त्यात आपुलकीच्या ओलाव्यापेक्षा औपचारिक रुक्षता जाणवते
तो संभ्रमाच्या गर्तेत आणखीन खोल रुतत गेला
तो विचार करतोय… त्याचं काही चुकलं का?
ती त्याच्या स्क्रिनवर रोज दिसते
काय आहे?… माणूस कायमचा निघून गेला किंवा तुम्हाला सांगून दूर झाला… तर काळ हे औषध होवू शकतं… त्यातून तुम्हाला सावरता येतं
पण समोर असणारा माणूस जेंव्हा तुम्हाला अवॉइड करतो किंवा अचानक म्यूट होतो तेंव्हा विलक्षण वेदना होतात…
पण त्याच्यासाठी ती न सांगता आणि काहीही न बोलता निघून गेली… त्याला न संपणाऱ्या विचार चक्रात अडकवून…
तो विचार करतोय… त्या फेसबूकच्या कोलाहलात ती कायमची हरवली? का…
अजूनही त्याच्या प्रतिक्रिया तिच्या सगळ्या पोस्ट्स वर असतात पण…
एक हळूवार जाणारी कहाणी इनबॉक्स मधे अचानक सुरू झाली आणि इनबॉक्स मधेच अचानक तिला पूर्णविराम मिळाला… का तो एक अल्पविराम आहे?
–©️विक्रम इंगळे
23 ऑक्टोबर 2021
अर्धसत्य | Half truth हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
अर्धसत्य | Half truth – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.